हिंदवी स्वराज्याचे संस्थापक गोब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज राजमाता वज्रचुडेमंडित महाराणी जिजाबाई साहेब महाराज यांच्या पवित्र कुशीत अवतीर्ण झाले. विदर्भातील सिंधखेड राजा येथील कर्तबगार राजे लखुजीराव जाधव यांच्या कन्या असणाऱ्या लाडक्या जिजाबाईंचा विवाह वेरुळचे कर्तबगार श्री मालोजीराजे भोसले यांचे सुपुत्र श्री शहाजीराजे यांच्या समवेत संपन्न झाला. त्या वेळी महाराणी जिजाबाई साहेब यांची बिदाई करताना राजे लखुजीराव यांनी जिजाबाईंच्या सोबतीला आपल्या जाधव घराण्यातील काही शूर सरदारांना पाठविले. ही जाधव सरदार मंडळी पश्चिम महाराष्ट्रात आली. श्री शहाजीराजांनी या जाधवांना जावली तालुक्यातील पिंपरी हे गाव इनाम दिले. महाराणी जिजाबाई साहेबांच्या सोबत म्हणजे 'वांगड' आले. म्हणून या जाधव सरदारांनी आपले जाधव हे आडनाव बाजूला ठेवून राजमातांचा संरक्षक सोबती याचे बिरुद म्हणून 'वांगडे' हे नाव धारण केले. 'सोबत' या नावाने मंडित असणाऱ्या या वांगडे घराण्याने इतिहासातील या चार शतकात अनेक कर्तबगार पुरुषांना जन्म दिला, ज्यांनी आपले जीवन राष्ट्रसेवेकरिता आणि ईशसेवेकरिता खर्ची घातले. त्या काळी बहुजन समाजात लेखन कला अवगत नसल्याने या पूर्वजांचा इतिहास आज विस्मृतीत गेला आहे. तरीही मौखिक माध्यमातून आपल्या पूर्वजांचे संस्मरण या घराण्याने पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवले आहे.
जावली परगण्यातील इनाम मिळालेल्या पिंपरी या गावातून कालांतराने काही घराणी सह्याद्रीच्या कुशीत उगम पावलेल्या पुण्यसलिला उमरोडीच्या कुलवृत्तांत तीरावर नित्रळ या गावी स्थायिक झाली. सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगा, उमरोळीचे झुळुझुळू वाहणारे अमृतजल, प्रचंड अशी वृक्षराजींनी वाढविली वनशोभा आणि सर्वात मोठी लाभलेली देगणी म्हणजे 'नित्रळ' गावातून होणारे 'सज्जनगड' दर्शन. संतपरंपरेतील अनमोल रत्न समर्थ रामदास स्वामी महाराज यांचे प्रासादिक समाधी स्थळ. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी ते कर्माचे रास्ते वाडा त्याची साक्ष देतो आहे. यशवंतरावांचे द्वितीय पुत्र कै. रावबा आणि त्यांची धर्मपत्नी यांचा एकाच दिवशी स्वर्गवास झाला ही सुद्धा आमच्या वांगडे घराण्यात झालेली अलौकिक घटना म्हणावी लागेल. पती आणि पत्नी यांचे एकत्रित सहगमन होणे ही एक ऐतिहासिक नोंद म्हणावी लागेल.
माझे पणजोबा म्हणजे यशवंतरावांचे द्वितीय सुपुत्र भाऊसाहेब होते. जे एक प्रथितयश असे शेतकरी होते. त्या काळात नित्रळसारख्या दुर्गम खेड्यात उत्तम प्रकारची शेती करीत होते. भाऊसाहेबांची सृजनशील वृत्ती पाहून रोहोट येथील श्री. बजाबा भोसले यांनी आपली बहीण काशीबाई यांचा विवाह भाऊसाहेबांसोबत करून दिला आणि सौ. काशीबाई वांगडे घराण्यात कुलवधू म्हणून आल्या. मला एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंब अशी ओळख असणाऱ्या भाऊसाहेब आणि काशीबाई यांच्या गृहस्थाश्रमात एकूण सात अपत्ये झाली. कन्या आपल्या घरी सुखाने नांदू लागल्या, तर भाऊ साहेबांचे तीन सुपुत्र पहिले श्री. रामचंद्र बुवा ज्यांना घरात 'आप्पा' म्हणत असत. दुसरे श्री. रावसाहेब ज्यांना घरात 'आबा' हे संबोधन होते, तर तिसरे श्री. लक्ष्मण बुवा यांना 'तात्या' या नावाने ओळखत असत. भाऊसाहेबांचा गृहस्थाश्रम सुरू झाला खरा, पण त्यांच्या धर्मपत्नी काशीबाई या अल्प आजाराने स्वर्गवासी झाल्या.
भाऊसाहेबांचा प्रपंच उघडा पडला. ज्या घरात आई नसते, त्या मुलांचे काय हाल असतात, हे शब्दात व्यक्त करता येत नाही. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे आई स्वर्गवासी झाली, त्या वेळेस ही सातही भावंडे १२ वर्षांच्या आतली होती. या वयात त्यांचे संगोपन कोण करणार? असा यक्षप्रश्न भाऊसाहेबांसमोर उभा राहिला. त्यांची कन्या बनुबाई आपल्या भावंडांना कण्या भरडून घालीत होती. भाकरी थापण्याचे वय देखील तिचे नव्हते, पण विचाराने शहाणी असणारी बनुबाई या कुटुंबाची 'आई' झाली. वितभर पोटाची खळगी भरण्यासाठी ती रोज कण्या भरडत होती आणि त्या शिजवून कशीतरी या मुलांची भूक भागवत होती. परिस्थिती अतिशय हलाखीची होती आणि बिकट होती. ज्येष्ठ असणाऱ्या रामचंद्रबुवा यांनी तर सज्जनगडावर श्रीरामरायाला नवसच केला, "हे रामराया, आमच्या घराण्यात कितीही अडचण आली तरी तुझी भक्ती अखंड राहू दे. सेवा अखंड करवून घे." कुलवृत्तांत
सरदार रास्ते यांच्या दप्तरी असणाऱ्या श्री. बाबाजी वांगडे यांना आपल्या बंधूचा संसार असा उघड्यावर आला हे पाहून अतीव दुःख झाले. त्यांनी या कुटुंबाला पुण्याला येण्याचा सल्ला दिला. परिणामी रामचंद्र बुवांनी रावसाहेबांना सांगितले, "राव, तू पुण्याला जा. शाळा शिकून मोठा हो. आम्ही आमचे शेतीचे पाहतो."
आपल्या वडीलबंधूच्या सूचनेनुसार रावसाहेब शिक्षणासाठी पुण्याला आपल्या चुलत्याकडे गेले. तेथे त्यांचे शिक्षणही चालू झाले. मात्र चौथी इयत्तेपर्यंत शिक्षण झाल्यावर रावसाहेबांचे मन त्यांना सतावू लागले. आपल्या वडिलांची आणि भावंडांची चाललेली ससेहोलपट डोळ्याला दिसे. मन खिन्न होत असे. अगदी पोरवयातही रावसाहेबांना अकाली प्रौढत्व आले. काही वेळेस संकटे माणसाला शहाणपण शिकवतात. रावसाहेबांनी चुलते बाबाजींचा आग्रह मोडून पुण्याला राम राम ठोकला आणि अर्थार्जनासाठी मुंबईची वाट धरली. वयाच्या अवघ्या १०व्या वर्षी रावसाहेबांनी सालेभाई शेठ यांच्याकडे पंखा हलवण्याची नोकरी पकडली. ही नोकरी सुद्धा भिवा मुकादमाच्या ओळखीने मिळाली. १० वर्षाचे म्हणजे काय फार पोक्त वय नव्हते. पण समज मोठी होती. या नोकरीच्या माध्यमातून रावसाहेबांनी स्वतःचा खर्च भागवून वडिलांना पहिल्याच महिन्यात रु. १५ गावाला पाठवले. आज पैशाची किंमत घसरली आहे. असे जुने लोक सांगतात की, तेव्हा रुपया गाडीच्या चाकाच्या आकाराचा होता. त्या काळात त्यांनी पाठवलेले १५ रुपये पाहून त्यांचे वडील भाऊसाहेब यांना काय वाटले असेल याची आज आपल्याला कल्पना येणार नाही. रावसाहेबांच्या भविष्यातील कर्तबगारीची नांदी या १५ रुपयांपासून झाली. आपल्या वडिलांना त्यांनी भक्कम असा आर्थिक आधार दिला. नित्रळ गावी कण्या आणि भाडगे खाऊन जगणाऱ्या या कुटुंबाची परिस्थिती सुधारली. यात विशेष म्हणजे एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत देखील या कुटुंबाने लाचारी पत्करली नाही आणि आपला स्वाभिमान सोडला नाही. प्राप्त परिस्थितीत ते आनंदात राहिले. ठेविले अनंते तैसेचि राहावे। चित्ती असू द्यावे समाधान।। कुलवृत्तांत
या संत तुकाराम महाराजांच्या वचनानुसार वांगडे परिवाराने प्राप्त परिस्थितीत आपला विकास साध्य केला. रामचंद्रबुवा, रावसाहेब आणि लक्ष्मणबुवा अर्थात आप्पा, आबा आणि तात्या या तीन भावांचा गृहस्थाश्रम सुरू झाला. रामचंद्रबुवांचा विवाह खडगाव येथील शिरटावले कुटुंबातील काशीबाई यांच्यासमवेत झाला. रावसाहेब यांचा विवाह रोहोट येथील निकम घराण्यातील धोंडोबाई यांच्याशी झाला आणि लक्ष्मणबुवा यांचा विवाह रेवलीगाव येथील वाईकर कुटुंबातील धोंडाबाई यांच्याशी झाला. तिघेही बंधू विवाहित झाले. या तीन बंधूंचे अल्पचरित्र सांगायचे झाल्यास रावसाहेब मास्तर यांनी मुंबईत आपले कर्तृत्व सिद्ध केले. नोकरी करीत असताना भजनाची आवड असल्याने आपल्या गावचे भजन मंडळ असावे म्हणून आपल्या बंधूंना बोलावून गोलपीठा कोळसागल्ली येथे 'श्री रामदास स्वामी प्रासादिक नित्रळकर भजन मंडळ' स्थापन केले. यात रावसाहेब स्वतः पेटी वाजवत असत. या नित्रळकर भजनी मंडळीचा आदर्श घेऊन मुंबई आणि परळी खोऱ्यात गावोगावी भजनी मंडळांची स्थापना झाली. रावसाहेबांना भारुडांचीही आवड होती. जवळपास ३५० भारुडे त्यांनी तोंडपाठ केली होती.
भजनासोबतच रावसाहेबांना कुस्तीचा छंदही होता. पैलवान तयार व्हावेत, याकरिता त्यांनी १९४३ साली कुंभारवाडा ६वी गल्ली, परशुराम त्रिंबक स्ट्रीट, मुंबई येथे 'रावबा मास्तर बजरंग व्यायामशाळा' स्थापन केली. त्यात अनेक नामांकित पहिलवान तयार झाले. ज्यांनी मोठमोठे कुस्त्यांचे फड गाजविले. कुस्त्यांच्या फडात आबा स्वतः पंच असत. चांगली कुस्ती झाली तर स्वतःच्या खिशातून पैलवानाला बक्षीस देत असत. फडात उभे राहिले आणि आबांचा खिसा रिकामा झाला नाही तरच नवल!
रावसाहेब मास्तरांनी अर्थात आबांनी अध्यात्मात, कुस्तीच्या आखाड्यात जसे नाव कमावले तसेच राजकारणातही आपला ठसा उमटवला. त्यांना जे.पी.चा बहुमान मिळाला. जिल्हा परिषदेवर ते निवडून आले. हे सारे लक्षात घेता आबा हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते, मुंबईत राहून मागासलेल्या परळी विभागासाठी बहुमोल कार्य त्यांनी केले. त्यांच्या पश्चात त्यांचे प्रासादिक कुलवृत्तांत २१ स्मारक त्यांच्या कार्याची साक्ष देत उभे आहे.