yogdan-breadcum

।। योगदान ।।

होम /

शैक्षणिक

educational-icon

सहकार क्षेत्रात यशस्वी वाटचाल करणारे भाई अचानक शिक्षण क्षेत्राकडे कसे वळले? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. मात्र जीवनातील एखादा अनुभव माणसाला एखाद्या उच्च ध्येयाप्रत घेऊन जात असतो आणि संकल्प जर सत्य असेल तर त्याचा भव्य प्रकल्प होऊ शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे सज्जनगडाच्या पायथ्याशी उभा असलेला 'ज्ञानश्री'चा प्रकल्प होय.
    भाईंचे शिक्षण नित्रळला झाले. प्राथमिक शिक्षणाची तत्कालीन अवस्था किती बिकट होती हे पाहिले. कालांतराने नित्रळची शाळा ७वी पर्यंत झाली. तरीही खेड्यापाड्यातील मुलांना ८वीच्या वर्गाकरिता परळीला जावे लागे. ही सल भाईंच्या मनात होती. त्यातून मार्ग निघाला. त्या वेळी मा. बळीभाऊ कदम हे जिल्हा परिषदेचे सभापती होते. त्यांची एक शिक्षण संस्था होती. त्यांच्या सहकार्याने या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून नित्रळला ८, ९, १०वीचे वर्ग रावसाहेब वांगडे मास्तर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने काढण्यात आले. सात गावांतील विद्यार्थ्यांचा मॅट्रिकपर्यंतच्या शिक्षणाचा प्रश्न मिटला. हेच खरे तर भाईंचे शिक्षण क्षेत्रात पडलेले पहिले पाऊल होते.
    मा. भाईंच्या मनात दुसरा एक विचार कायम येत असे आणि तो म्हणजे खेड्यात शिकलेल्या विद्यार्थ्यांचे इंग्रजी कच्चे असते. उच्चारही नीट नसतात. त्यातून नागरी आणि ग्रामीण असे विद्यार्थ्यांत भेद होतात. ग्रामीण भागात इंग्लिश मिडियमची स्कूल असावी असे अनेकदा भाईंना वाटे. या संकल्पाला मूर्त रूप देण्याकरिता सातारा शाखेचे कमिटी मेंबर श्री. अंकुश साळुंखे (बापू) आणि शिवसह्याद्री सातारा शाखेचे शाखाधिकारी मा. ज्ञानदेव किसन रांजणे यांनी अथक परिश्रम केले. कु. नेहा साबळे मॅडम यांच्या देखरेखीखाली शिवसह्याद्री किड्स वर्ल्ड या नावाने के.जी. आणि नर्सरी असे दोन वर्ग सुरू झाले. १२३ मा. भाईंच्या जन्मदिनाचे औचित्य साधून १६-६-२००४ रोजी या कार्याचा शुभारंभ झाला. पुढे दरवर्षी एक-एक इयत्ता वाढवत आज के.जी. ते १० वी. पर्यंत इंग्रजी शिक्षण देणारा हा प्रकल्प 'शिवसह्याद्री इंग्लिश स्कूल' या नावाने कार्यरत आहे. शिक्षणाचा दर्जा सर्वोत्तम कसा राहील याकडे मा. नेहा साबळे मॅडम जातीने लक्ष देत असतात. स्कूलचा आतापर्यंतचा निकाल उत्तम प्रतीचा आहे. त्यामुळे आज साताऱ्यातील पहिल्या पाच शाळांमध्ये या शाळेचा क्रम लागतो, एवढी गुणवत्ता आपण प्राप्त केली आहे. या स्कूलची शाखा गजवडीसोनवडी येथे काढण्यात यश लाभले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात इंग्रजी शिक्षण घेण्याचे नवीन दालन मा. भाईंनी खुले केले आहे. माझा प्रत्येक विद्यार्थी आजच्या स्पर्धेच्या युगात कुठेही मागे राहता कामा नये, त्याने यशाची उंचच उंच शिखर पादाकातं करावी ही उत्तगुं मनीषा भाइच्या अतंःकरणात वास करीत आहे
    'ज्ञानश्री'च्या निर्माणाच्या मागे एक घटना नमूद करावी लागेल. आपल्या जीवनातील एखादी प्रतिकूलता पुढील भविष्यकाळात भव्यतम अनुकूलता उभी करू शकते, याचे ते उत्तम उदाहरण म्हणावे लागेल. भाईंचे चिरंजीव रोहित यांनी बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर सिव्हिल इंजिनीयरिंग करण्याचे ठरविले. त्या दिशेने हालचाली सुरू झाल्या. साताऱ्यामधील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवण्याकरिता प्रयत्न सुरू झाले. रोहित, स्वतः भाई आणि ज्ञानदेव रांजणे यांनी अथक प्रयत्न केले. परंतु साताऱ्यात अॅडमिशन मिळाले नाही. शेवटी पुण्याला व्ही.आय.टी. कॉलेजमध्ये रोहितला प्रवेश मिळाला. या प्रतिकूल घटनेचा भाईंच्या मनावर खोल परिणाम झाला. भाईंच्या मनात विचार डोकावला की, आपल्यासारख्या व्यक्तीला जर कॉलेज प्रवेशाकरिता इतकी वणवण करावी लागते, तर सर्वसामान्य खेड्यातील एखाद्या विद्यार्थ्याला जर नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर त्याच्या पालकांना किती अडचणींना तोंड द्यावे लागेल. तरीही यश येईल असे नाही. ही विचारचक्रे सुरू असताना आठ दिवस भाईंना झोप लागली नाही. मन अस्वस्थ झाले. त्यातूनच एका विलक्षण इच्छाशक्तीचा उदय झाला. जिद्द जिवंत असेल आणि जिज्ञासा जागी असेल तर कर्तृत्ववान व्यक्तीला स्वतःचे विश्व निर्माण करता येते.
    सत्य संकल्पाचा दाता नारायण। सर्व करी पूर्ण मनोरथ।।
मा. भाईंच्या मनात 'ज्ञानश्री'चा शुभसंकल्प उभा राहिला. इंग्लिश मिडियम स्कूलचा थोडाबहुत अनुभव गाठीशी होता. पण अभियांत्रिकी महाविद्यालय ही संकल्पना खूप मोठी होती. आव्हान खूप मोठे होते. भाईंच्या सर्व सहकाऱ्यांनी भाईंना पाठबळ देण्याचे ठरविले. वरील वचनाप्रमाणे संकल्प जर सत्य असेल तर तो भगवंत त्याला सहाय्यभूत होत असतो. महाविद्यालयाला लागणाऱ्या सर्व परवनग्या आणण्याची जबाबदारी सचिव मा. ज्ञानदेव रांजणे यांनी घेतली, तर आर्थिक सहकार्याची जबाबदारी प्रताप वांगडे व संदीप राऊत यांनी घेतली. याचा पाठपुरावा करण्याकरिता भाईंना प्रचंड धावपळ करावी लागली. मुंबई- सातारा आणि सातारा-मुंबई या फेऱ्या वाढल्या. शिवसह्याद्री पतसंस्था, सातारा बँक यांचा व्याप सांभाळून रात्रंदिवस भाई आपल्या ध्येयाच्या दिशेने धावत होते. जवळपास दीड वर्षाचा काळ लोटला. शासनाकडून २२.५ एकर जागेची परवानगी मिळाली होती. इतरही कागदपत्रे तयार होती. दरम्यान आपले महाविद्यालय कसे असावे? याकरिता महाराष्ट्रातील विविध नामांकित महाविद्यालयांना भेटी देणे चालू होते. त्यात त्यांच्या इमारतीपासून ते व्यवसायापर्यंतचा सारा अभ्यास करणे चालू होते. अखेर शासनाकडून क्षेत्र माहुली येथील जागेचा ताबा मिळाला. त्यासाठी लागणारे शुल्क शासन दरबारी भरण्यात आले. संपूर्ण जागेला कम्पाऊंड करून घेण्यात आले. भाईंसह सर्व सहकाऱ्यांना आनंद झाला. मात्र भगवंताच्या मनात काही वेगळेच चित्र होते. या जागेच्या आजूबाजूला असणाऱ्या स्थानिक जागा मालकांच्या अंतर्गत वादविवादामुळे अडचणी येऊ लागल्या. मा. भाईंनी या स्थानिक शेतकऱ्यांसमवेत सामोपचाराची चर्चाही केली. मात्र सकारात्मक कौल मिळाला नाही. आता पुढे काय? हा मोठा प्रश्न भाई आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांपुढे उभा राहिला. हे कार्य अर्धवट सोडावे तर दोन वर्षांची मेहनत पाण्यात जाणार आणि नवीन ठिकाणी हा प्रकल्प उभा करावा तर पुन्हा ग, म, भ, न पासून सुरुवात करावी लागणार. सर्व मंडळी श्री क्षेत्र माहुलीला होती. ती सारी सुन्न झाली. भाईंच्या मनात विषण्णता निर्माण झाली. काय करावे? हा प्रश्न सतावत होता. एक गोष्ट घडली. त्या वेळी भाईंचे मन सज्जनगडाकडे ओढले गेले. भाई सर्वांना म्हणाले, "चला सज्जनगडावर जाऊ या." उपस्थित सर्व सहकाऱ्यांना भाईंच्या या वागण्याचे एक प्रकारचे आश्चर्य वाटले. समोर केवढा मोठा प्रश्न उभा राहिला आहे आणि भाईंना सज्जनगड सुचतो आहे. मात्र कुणी विरोध करू शकला नाही. सर्व जण भाईंच्या सूचनेनुसार गाडीत बसून सज्जनगडाच्या दिशेने निघाले. मा. भाईंचा निर्णय योग्य होता. मनावर वडिलांनी दिलेले वारकरी संस्कार सांगत होते. ज्या वेळी अडी-अडचणी येतील, त्या वेळी संतांपाशी जावे. तेच चांगला मार्ग दाखवू शकतात. मार्ग दाऊनी गेले आधी। दयानिधी संत ते।। या संत वचनावर विश्वास ठेवून भाई सहकाऱ्यांसह श्री क्षेत्र सज्जनगडावर आले. कुणी कुणाशी बोलत नव्हते. निशब्द शांतता. गडावर संस्थानचे प्रमुख पूज्य श्री मोहनबुवा रामदासी यांची भेट घेतली. श्री रामरायांचे आणि श्री समर्थांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्या मंदिरात बसल्यानंतर मनातील निराशा पळून गेली. संत दर्शनाने मन प्रसन्न झाले. समर्थांचा प्रसाद घेऊन भाई गड उतरू लागले. वाहनतळ आला. वाहनतळाच्या पूर्वेला भाईंची पावले ओढली जाऊ लागली. ही ओढ का होती? काहीच संदर्भ लागेना. इतक्या वेळा भाई गडावर आले, पण अशी ओढ कधी लागली नसल्याचे त्यांनी अनुभवात सांगितले. शेवटी सारा परिसर न्याहाळला. एवढ्यात सहकारी मंडळींनी हाक दिली. भाई भानावर आले. गाडीत बसले. गाडी गड उतरू लागली. पुढच्या वळणावर गाडी थांबवली. प्रचंड मोठे माळरान हाका मारीत होते. भाईंनी आपल्या सहकाऱ्यांना विचारले, "आपल्या 'ज्ञानश्री' करिता ही जागा कशी वाटते?" सर्वांना या प्रश्नाचे हसू आले. एवढ्या फोंड्या माळावर काय प्रकल्प करणार? असा प्रश्न कदाचित उभा राहिला असेल. मात्र भाईंनी मनोमन या जागेची निश्चिती केली. याच ठिकाणी आपला प्रकल्प उभा राहील, याचा आत्मविश्वास अंतर्मनाने दर्शविला. या जागेसंबंधी सर्व चौकशी करावी असा आदेश भाईंनी दिला. कारण तत्क्षणी भाईंच्या समोर लोहगडाजवळ (लोणावळा) उभा असलेला सिंहगड इन्स्टिट्यूटचा प्रकल्प उभा होता. महिनाभरात सारी चौकशी करून गजवडी-सोनवडी या गावातील त्या जागेच्या संबंधित सर्व लोकांच्या भेटी घेऊन खरेदीबाबत चर्चा केली. त्यांनी कोणतीही अडचण न आणता या महत्त्वपूर्ण प्रकल्पाकरिता खरेदीची अनुमती दिली. तेथील मनात ठरवलेली २२.५ एकर जागा ट्रस्टच्या नावावर खरेदी केली. या खरेदी मध्ये श्री. तुळशीराम शेलार यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात जून २०११ ला झाली. महाराष्ट्रातील इतर कॉलेजना भेटी दिल्या होत्या. कल्पना ही होती की, आपल्या कॉलेजची इमारत इतर महाविद्यालयांपेक्षा आगळीवेगळी असावी. ही इमारत सर्व सोयींनी युक्त असावी. इमारत बांधतानाच भविष्यात परदेशी युनिव्हर्सिटीशी टायअप करता येईल, अशा पद्धतीने बांधकाम करण्याचे ठरले. त्याकरिता बांधकामाकरिता वापरण्यात येणारे साहित्य अगदी मार्बलपासून लाईट फिटिंगपर्यंतचे सर्व साहित्य उच्च प्रतीचे वापरण्यात आले. महत्त्वाची गोष्ट या सर्व बाबी स्वतः भाई बारकाईने पाहात होते. त्यातूनही कोणताही अनावश्यक खर्च होणार नाही, अशीही दक्षता घेण्यात आली. यामध्ये श्री. प्रदीप गोसावी यांचे सहकार्य मिळाले. या भव्य-दिव्य प्रकल्पाच्या इमारतीकरिता लागणार मोठे आर्थिक सहाय्य आपल्या शिवसह्याद्री पतपेढीने आणि मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पुरविले. समर्थ कृपेने आणि पूर्वजांच्या पुण्याईने कोणतेही विघ्न न येता बांधकाम पूर्णत्वास गेले. या उघड्या माळाचे नंदनवन झाले. दोन मजल्यांचे बांधकाम पूर्ण झाल्यावर भाईंचे स्नेही मा. प्रसाद आचरेकर यांचे अनमोल सहकार्य लाभले. या इमारत बांधकामाचे वैशिष्ट्य असे की, दिवसा कोणत्याही वर्गात लाईटची गरज भासत नाही. स्वच्छ सूर्यप्रकाशाने युक्त अशी बांधकामाची रचना आहे. इमारतीच्या तळमजल्यावर कार्यालय, प्राचार्यांची केबिन, सचिवांची केबिन, हॉल आणि क्लासरूम अशी रचना केली आहे. दुसऱ्या मजल्यावर प्रशस्त वाचनालय, मिटिंग हॉल, मा. भाईंकरिता केबिन, विश्रांतीगृह, तसेच क्लासरुम अशी व्यवस्था केली आहे. प्रत्येक डिप्लोमा व डिग्रीला लागणाऱ्या लॅब याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. एका वेळी १०० विद्यार्थी बसू शकतील एवढी प्रशस्त कॉम्प्युटर लॅब करण्यात आली आहे. या इमारतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे सोलर आणि पवनचक्कीची व्यवस्था करण्यात आली आहे. 'ज्ञानश्री' या संस्थेकरिता सर्वात मोठा प्रश्न होता तो पाण्याचा. एवढ्या उंच जागी लागणाऱ्या पाण्याचा साठा कोठून आणणार? त्यावर उपाय निघाला, उरमोडी धरणापासून कॉलेजपर्यंत पाईपलाईन करून पाणी आणण्यात आले. याबाबतीत स्थानिक लोकांनी खूप मोठे सहकार्य केले. गडाच्या वर म्हणजे ठोसेघरच्या शेजारी असणाऱ्या पांगारे या धरणातून पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. या कामी पांगारे ग्रामस्थांनी आम्हाला बहुमोल सहकार्य केले. या साऱ्या विवेचनाचा सारांश असा की, मा. भाईंनी आपल्या मनातील भव्य आणि दिव्य प्रकल्प स्वतःच्या देखरेखीखाली, आपल्या सर्व सहकारी मित्रांना बरोबर घेऊन, स्थानिक लोकांची मने जिंकून, त्यांनाही या उपक्रमात सहभागी करून, महाराष्ट्राच्या सर्व विद्यापीठांना कौतुक वाटावे अशा प्रकारची 'ज्ञानश्री' उभी केली. आज डिप्लोमा आणि डिग्री कॉलेजमध्ये जवळपास बाराशे विद्यार्थी विद्यार्जन करीत आहेत. विशेष म्हणजे जो हेतू धरून भाईंनी 'ज्ञानश्री' उभी केली तो हेतू साध्य झाला आहे. अतिदुर्गम भागातील आणि माण-खटाव इत्यादी दुष्काळी भागातील विद्यार्थी अधिक प्रमाणात आहेत. जे उच्चशिक्षणापासून वंचित होते. त्याकरिता 'ज्ञानश्री' वरदान ठरले आहे. मुंबई गोवा प्रांतातीलही विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत. आपल्या या कॉलेजचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मुलींची संख्या अधिक प्रमाणात आहे, हे पाहून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना असतील तेथून आनंद झाला असेल. ज्ञानश्रीचे कामकाज करताना आज मला स्वतःला कृतार्थ झाल्याचा आनंद होतो आहे. मा.श्री. डॉ. ए.डी. जाधव सर प्राचार्यपद यशस्वीरीत्या सांभाळीत आहेत. उपप्राचार्य मा.श्री. उमाशंकर मोरे सर त्यांना सर्वतोपरी सहकार्य करीत आहेत. भाईंचे चिरंजीव रोहित एम.डी. पदाची धुरा सांभाळीत आहेत. 'ज्ञानश्री'चा अध्यापक वर्ग आणि कर्मचारी वर्ग आपापल्या कर्तव्याची परिपूर्ती करीत आहे. माझ्या माहितीप्रमाणे सह्याद्रीच्या पर्वतरांगांत अत्यंत निसर्गरम्य अशा वातावरणातील 'ज्ञानश्री' हे एकमेव महाविद्यालय ठरावे. श्रेत्र माहुलीची जागा बदलून समर्थांनीच या ठिकाणी भाईंना आणले. आपणासी जे ठावे । ते इतरांसी सांगावे। शहाणे करुनी सोडावे। सकळजन।। या समर्थांच्या वचनातून शिक्षणाची बीजभूमिका कळते. ही शिकवण देणाऱ्या श्री समर्थांच्या सज्जनगडासमीप श्री. भाईंनी 'ज्ञानश्री' हा शिक्षणगड उभा केला आहे. या शिक्षणगडातून राष्ट्रहिताकरिता उच्चविद्याविभूषित, सुसंस्कृत पिढी निर्माण होईल, याचा आत्मविश्वास आहे.

सामाजिक

शिवसह्याद्री परिवाराचे कुटुंबप्रमुख श्री, ज्ञानेश्वर बापूसाहेब वांगडे (भाई) यांचे कुशल नेत्रुत्व आणि मार्गदर्शनाखाली त्यांनी स्थापन केलेल्या अर्थिक, शैक्षणिक, आणि सामाजिक संस्था संबंधित क्षेत्रात कार्यरत आहेत आणि त्या काम करीत असताना त्या संस्था आपल्या उत्कृष्ट कामकाज, गुणवत्ता आणि निस्वार्थी सेवेमुळे नेहमीच अग्रेसर राहीलेल्या आहेत.अश्या असामान्य व्यक्तिमत्व असणाऱ्या म्हणजेच भाईंच्या नावाने शिवसह्याद्री परिवाराच्या वतीने भाई वांगडे प्रतिष्ठान ची स्थापना करण्यात आली आहे.या प्रतिष्ठानच्या मार्फत सामाजिक, शैक्षणिक, कला आणि क्रीडा या क्षेत्रामध्ये काम करणे हा या मागील मुख्य उद्धेश असणार आहे.

सहकार

sahkar-icon

मा. भाईंच्या एकसष्ठीनिमित्ताने एक सर्वांगसुंदर गौरवग्रंथ निर्माण करण्याचे ठरले. त्या वेळी माझ्या मनात एक विचार डोकावला आणि तो म्हणजे भाईंच्या या कर्तृत्वसंपन्न शिल्पाला घडवणारे जे शिल्पकार आहेत, सहकारात पावलोपावली सहकार्य करणारे सहकारी आहेत, या सर्व सहकारी योगींची माहिती असणे क्रमप्राप्त होय. त्याकरता सातारच्या एका निवांत भेटीत मी भाईंना विचारले, आपल्या या सहकाराच्या वाटचालीत जे मार्गदर्शक लाभले, त्यांची मला माहिती हवी आहे. त्यावर भाई काही वेळ शांत बसले. मुळातच भाईंना प्रसिद्धीपासून दूर राहण्याची सवय. त्यातून स्वतःवर काही लिखाण व्हावे, असे त्यांचे मत नव्हते. मात्र माझ्या आग्रहापोटी त्यांना अत्यंत कृतज्ञतेने खालील महनीय व्यक्तिमत्त्वांचा आदरपूर्वक उल्लेख केला. ती श्रेयनामावली अशी

स्व. बाबुरावजी शेटे साहेब

परमपूज्य ह.भ.प.वै. दत्तात्रय महाराज कळंबे

स्व. अॅड. नरेंद्र गुंजाळकर

मा. श्री. दिनकरराव पाटील (मा. पोपटशेठ)

मा. खा. श्री. आनंदरावजी आडसूळ

मा. श्री. शिवाजीराव नलावडे

मा. आमदार श्री. प्रवीणजी दरेकर

मा. श्री. विद्याधर अनास्कर

मा. श्री. सि.बा. आडसूळ

मा. श्री. संजयजी शेटे

मा. श्री. दत्ताराम चाळके

मा. श्री. संदीप घनदाट

सॉलिसीटर स्व. गुलाबराव शेळके

मा. श्री. चंद्रकांत दळवी

मा. श्री. एम.ए. आरिफ

स्व. साहेबरावजी देशमुख

मा. गुलाबरावजी जगताप

स्व. खासदार एकनाथजी ठाकूर

कै. अशोक गजरे

श्री. अशोकराव शेटे

श्री. वसंतराव बळीराम माने (पत्रकार)

धार्मिक

पंढरीची वारी आहे माझे घरी।
आणिक न करी तीर्थव्रत ।।
    या संत तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे आमच्या घराण्याला पंढरीच्या वारीची भव्य दिव्य परंपरा लाभली आहे. त्यामागे निश्चितच ज्ञानोबा-तुकोबांची कृपा आहे. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचे पूर्ण कृपाछत्र सत्पुरुष म्हणजे प्रेममूर्ती सद्गुरू श्री दादामहाराज सातारकर, ज्यांना साताऱ्याच्या समीप असणाऱ्या श्री जरंडेश्वर मारुतीरायांचा प्रसाद प्राप्त झाला होता, विश्वमाऊली संतश्रेष्ठ ज्ञानोबारायांचा साक्षात्कार झाला होता. दादामहाराज हे एक अलौकिक महापुरुष होते. 'दर्शने प्रशस्ति पुण्यपुरुष' असेच त्यांचे वर्णन करावे लागेल. सातारच्या बुधवार नाक्यावर त्यांचे श्री मारुतीरायांचे मंदिर होते. तेथे त्यांचा निवास असे. त्यांच्या सान्निध्यात हजारो लोकांचे कल्याण झाले. याचे कारण त्यांची ज्ञानेश्वरी सांगण्याची हातोटी अतिशय वेगळी होती. त्यांची ज्ञानेश्वरी ऐकलेला श्रोता त्यांना कायमस्वरूपी चिकटत असे, अशी त्यांच्या ज्ञानेश्वरी प्रवचनाची गोडी अवीट होती.
    एक शतकापूर्वी जी अध्यात्माची गोडी असणारी भक्तमंडळी सद्गुरू दादामहाराजांच्या सान्निध्यात राहिली, त्यात योगायोगाने आणि पूर्वसुकृताची काही जोडी गाठीशी असल्याने माझे आजोबा वै. रामचंद्रबुवा अर्थात आप्पा दादामहाराजांच्या चरणसान्निध्यात आले. महाराजांच्या ज्ञानेश्वरी निरुपणाचा एवढा प्रचंड प्रभाव अप्पांवर पडला की, ते दादामहाराजांचे परमभक्त झाले. त्यांनी दादामहाराजांकडून वारकरी पंथाची दीक्षा घेतली. गळ्यात तुळशीची माळ घातली.
    तुमचा अनुग्रह लाधलो।
    पावन झालो चराचरी ।।
    या संत एकनाथ महाराजांच्या वचनोक्तीप्रमाणे आमच्या घराण्याचा अभ्युदय त्याच क्षणी झाला, असे म्हणण्यास हरकत नाही. सद्गुरू दादामहाराजांच्या पावन सान्निध्यात आप्पांचे जीवन उजळून गेले. आमच्या वांगडे घराण्याला आप्पांमुळे वारकरी पंथाचे बाळकडू मिळाले. मागील प्रकरणात आपण जाणलेच आहे की, आमच्या घरात भजनाचा परिपाठ अप्पांनी सुरू केला आणि माझे चुलते अर्थात तात्यांनी तो जोपासला. या संत समागमाने आमच्या घराण्यात पंढरीची वारी सुरू झाली.
    वै. आप्पांच्या नंतर पुढच्या पिढीत माझे वडील ती. अण्णा संतमाऊली आप्पामहाराज सातारकर यांच्या पवित्र सान्निध्याला प्राप्त झाले.
    संत समागमी धरावी आवडी।
    करावी तातडी परमार्थाची ।।
    या तुकोबारायांच्या वचनानुसार ती. अण्णांनी परमार्थाची तातडी केली आणि संत माऊली आप्पामहाराज यांच्याकडून वारकरी पंथाची दीक्षा घेतली. त्यांच्या हातून पवित्र तुळशीची माळ घातली. संतमाऊली आप्पामहाराज सातारकर हे एक थोर साक्षात्कारी पुरुष होते. सद्गुरू दादामहाराजांचे ज्ञानेश्वरीवर प्रभुत्व होते, तर संत आप्पामहाराजांचे शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या भागवत ग्रंथावर प्रभुत्व होते. त्यांचे भागवत निरुपण ऐकलेला श्रोता धन्य म्हटला पाहिजे. ही धन्यता अण्णांच्या वाट्याला आली. गिरगावातील कांदेवाडीत ते आप्पामहाराजांच्या श्रवणाला जात असत. आमच्या अण्णांच्या तोंडून आप्पामहाराजांच्या आठवणी ऐकताना एक सात्त्विक आनंद होत असे. आमच्या घराण्याची दूसरी पिढी भक्तिरसात न्हाऊन निघाली.
    हा सारा इतिहास सांगण्याचे कारण या चरित्र ग्रंथाचे चरित्र नायक माझे बंधू भाई यांच्या जीवनातील हा अद्भुत प्रसंग सांगितल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. घरातील वारकरी संस्कार पुढील पिढीचा उत्कर्ष कसा करतात याचे हे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल. आमच्या घराण्यातील ही एक अलौकिक घटना तुमचा अनुग्रह लाधलो म्हणावी लागेल. काय योग असतात, आमचे आजोबा हे सद्गुरू दादामहाराजांचे कट्टर अनुयायी होते. आयुष्यभर त्यांनी परमार्थच केला आणि परमार्थाची इतिश्री ही त्यांच्या मृत्युसमयी कळते.
    संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे -
    याचसाठी केला होता अट्टहास।
    शेवटचा दिवस गोड व्हावा ।।
    आयुष्याचा शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे, याकरिता आयुष्यभर हरिनामाचा अट्टाहास केला पाहिजे. ती. आप्पांनी आपल्या वैकुंठगमनाचा दिवस निवडला तोही अलौकिक होता. त्यांचे सद्गुरू श्री दादामहाराज सातारकर यांचा अवतरण दिवस भाद्रपद शुद्ध पंचमी अर्थात 'ऋषी पंचमी' होय. आपल्या सद्गुरू स्वरूपात विलीन होण्यासाठी आप्पांनी ऋषी पंचमीचा मुहूर्त साधला आणि आप्पांनी या पवित्र योगावर आपली ईहलोकीची यात्रा पूर्ण केली. अंत्यसंस्कार झाले. विज्ञानयुगातील आश्चर्य म्हणजे अंत्यसंस्काराच्या जागी तुळशी निघाल्या. सर्वांनी ते दृश्य याची देही याची डोळा पाहिले. पुढे दहाव्या दिवशी दशक्रिया विधीला सारे आप्तेष्ट आणि परिवार जमला. आप्पांचा दशक्रिया विधी झाला, पण काही केल्या पिंडाला कावळा शिवेना. काकस्पर्श होत नाही म्हटल्यावर आम्ही सारे सचिंत झालो. सर्व जणांनी नमस्कार करून झाला, पण कावळा मंदिराच्या कळसावर बसायचा. पुन्हा पिंडाजवळ यायचा. पुन्हा उडून कळसावर बसायचा. असे बऱ्याचदा झाले. माझे वडील ती. अण्णांच्या लक्षात ही गोष्ट आली. स्व. आप्पांचा जीव कशात अडकला आहे. कारण अंतिम काळात आप्पांनी मा. भाईंना उपदेश केला होता. "तू वारकरी हो. हरिभक्तीची वाट धर. तुझे कल्याण होईल." हे शब्द अण्णांना आठवले.
    वारकऱ्यांची अंतिम इच्छा कोणती असते? असे विचारले तर त्याचे उत्तर एवढेच असेल की, माझी पंढरीची वारी पुढे चालली पाहिजे. माझ्या घराण्यात पंढरीची वारी अखंड राहिली पाहिजे. आप्पांचा जीव भाईंवर होता. भाईंनी वारकरी व्हावे ही त्यांची इच्छा. ती. अण्णांनी भाईंना जवळ बोलावले आणि तुमचा अनुग्रह लाधलो सांगितले, आप्पांना नमस्कार करून सांग की, "मी वारकरी होईन आणि हरिभक्तीची परंपरा सांभाळीन."
    वडिलांच्या आज्ञेनुसार मा. भाईंनी आप्पांच्या पिंडाला नमस्कार केला. वरील प्रार्थना केली आणि काय आश्चर्य? इतका वेळ घिरट्या घालणारा कावळा क्षणात खाली आला आणि त्याने पिंडाला स्पर्श केला. काकस्पर्श होताच सर्वांनी समाधान व्यक्त केले. आज विज्ञानयुगात पुरोगामी विचारसरणीत हे सारे थोतांड वाटेल, पण मी प्रत्यक्ष अनुभवलेल्या अनुभवाचे हे कथन केले आहे.
    आपल्या आजोबांना दिलेल्या वचनाप्रमाणे माझे बंधू मा. भाई पंढरीचे वारकरी झाले. वारकरी पंथाचे अध्वर्यू प.पू. श्री. बाबामहाराज सातारकर यांच्याकडून वारकर पंथाची दीक्षा घेतली. गळ्यात पांडुरंगाची प्रिय माळ घातली. अशा रीतीने आमच्या घराण्याची तिसरी पिढी वारकरी झाली. आज मा. भाईंची प.पू. बाबामहाराजांवर अढळ निष्ठा आहे.
    सद्गुरू सारिखा सोयरा जिवलग।
    तोडिला उद्वेग संसारिचा ।।
    या संतश्रेष्ठ नामदेव रायांच्या विचारांप्रमाणे भाईंना सद्‌गुरुचरण लाभले आहेत. प.प. बाबामहाराजांचे वर्णन माझ्यासारख्या पामराने काय करावे? त्यांचे वर्णन करणे म्हणजे सूर्यबिंबाला काडवातीने ओवाळण्यासारखे आहे.
    प.पू. श्री. बाबामहाराज सातारकर ही वारकरी पंथाला लाभलेली दैवी देणगी म्हणावी लागेल. महाराजांचे गायन, निरुपण आणि त्यांची नामनिष्ठा हे सारे सारे अनुपम्य म्हणावे लागेल. महाराजांचे 'रामकृष्ण हरि' भजन श्रोत्यांना सहज समाधीचा अनुभव प्रदान करते. त्यांनी केलेले निरुपण साधकाला सन्मार्गाला लावते. आजपर्यंत महाराजांनी लाखो लोकांना वारकरी पंथाची दीक्षा देऊन कृतार्थ केले आहे. त्यांचे वर्णन करताना मला एवढेच म्हणता येईल,
    काय वानू आता न पुरे ही वाणी।
    मस्तक चरणी ठेवितसे ।।
    प.पू. महाराजांच्या सात्त्विक सहवासात मा. भाईंचे जीवन आकाराला आले.
तुमचा अनुग्रह लाधलो आज हा सारा इतिहास पाहताना एक फार मोठे कौतुक वाटते. ते कोणते? तर सातारकर घराण्याच्या तीन पिढ्या म्हणजे सद्गुरू श्री दादामहाराज सातारकर, संतमाऊली आप्पामहाराज सातारकर, प.पू. श्री. बाबामहाराज सातारकर. आमच्या वांगडे घराण्याच्या तीन पिढ्या ती. रामचंद्रबुवा ऊर्फ आप्पा, ती. बापूसाहेब ऊर्फ अण्णा आणि मी ज्ञानेश्वर वांगडे म्हणजे मा. भाई. माझे आजोबा ती. आप्पा यांनी सद्गुरू दादामहाराज सातारकर यांचा अनुग्रह घेतला. माझे वडील ती. अण्णा यांनी संतमाऊली श्री अप्पामहाराज सातारकर यांचा अनुग्रह घेतला आणि माझे बंधू मा. भाई यांनी प.पू. बाबामहाराज सातारकर यांच्याकडून अनुग्रह घेतला. या शतकभरात सातारकर परंपरेच्या तीन महान सत्पुरुषांची कृपा आमच्या वांगडे घराण्याला लाभली म्हणून असे म्हणावे वाटते
    तुमचा अनुग्रह लाधलो। पावन झालो चराचरी ।।
    आज शिवसह्याद्री पतसंस्थेचा रजत महोत्सव साजरा होतो आहे. या पंचवीस वर्षात २५ शाखा झाल्या. या शाखांच्या उद्घाटन प्रसंगी अनेकदा प.पू. श्री. बाबामहाराज सातारकर यांचे आशीर्वाद प्राप्त करणारे कीर्तन झाले. आषाढी वारीत शिवसह्याद्री पतसंस्थेच्या वतीने केली जाणारी वारकऱ्यांची सेवा सर्वश्रुत आहे. आज पतसंस्थेत अनेक कर्मचारी वारकरी पंथाचे अनुयायी आहेत. शिवसह्याद्री सहकारी पतपेढी म्हणजे वारकऱ्यांची पतपेढी असा नावलौकिक जनमानसात दृढ झाला आहे. याचे सारे श्रेय आमच्या गुरुपरंपरेला द्यावे लागेल. या लेखाचा समारोप करताना एवढेच म्हणता येईल.
    साडेपंधरेचा रजतवणी। तैसी स्तुतीची ही बोलणी।
    निवांत माथा ठेविजे चरणी। हेचि भले ।।

आरोग्य